मोडनिंब – माढा तालुक्यातील मोडनिंब शहराचा पाणीपुरवठा गेल्या सुमारे आठ ते दहा दिवसांपासून काही प्रभागात बंद असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असून, उन्हाच्या तीव्रतेत पाण्याची व्यवस्था करताना महिला व लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.मोडनिंब शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येवती येथे पाणीपुरवठा यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. येवती येथे फ्लेंच तुटणे तसेच यापूर्वी केबल चोरी, मोटार जळणे, पाइपलाइनची तोडफोड, गळती, फिल्टरवरील मोटार जळणे अशा विविध समस्यांमुळे पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने सोशल मीडियाच्या मॅसेजच्या माध्यमातून नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध असूनही विविध अडचणींमुळे वेळेत पाणीपुरवठा करता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पाणीपुरवठ्यातील ९० टक्के अडचणी मानवनिर्मित असल्याचा दावा करत संबंधितांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले आहे. तसेच नागरिकांच्या या गंभीर प्रश्नावर स्थानिक नेतेमंडळी आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप ठोस भूमिका मांडली जाताना दिसत नाही. इतर राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांवर सक्रिय असणारे नेते पाणीटंचाईच्या मुद्द्यावर मात्र गप्प का? नागरिकांना पाणी मिळत नसताना त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न उपस्थित होत असून, आता तरी नेतेमंडळींनी मौन सोडून नागरिकांच्या पाणीप्रश्नावर पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.
पाण्याची उपलब्धता; तरीही पाणी नाही
येवती येथून पुरेसे पाण्याची उपलब्धता असतानाही नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागील कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करणार कोण? नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोण घेणार? आणि या प्रश्नावर पुढाकार कोण व कधी घेणार? असे सवाल नागरिकाकांडून उपस्थित केले जात आहेत.
पाईपलाईन जुनी असल्याने वारंवार फुटत आहे. या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात लिकेज व दुरुस्ती केलीआहेत रोटेशन उशिराने होत आहे. ते या चार दिवसांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्याची दक्षता घेत आहे.
एम.जी .पाटील
प्रशासक
ग्रामपंचायत मोडनिंब



















