सोलापूर : आईशक्ती फाउंडेशन आणि विश्व फाउंडेशन शिवपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १३ हजार शालेय विद्यार्थिनींना सुदृढ आरोग्यासाठी प्रोटीन पावडर देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सोनामाता प्रशालेत करण्यात आला. विश्व वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ. गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४५० विद्यार्थिनींना प्रोटीन पावडर देण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर विश्व वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ. गिरीजा राजीमवाले, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, अध्यक्ष सृष्टी डांगरे,उज्वला शिरूर, सुगत गायकवाड, व्यंकटेश केंची, माधुरी बाग, डॉ. सत्वशील कुसुंबे, मुख्याध्यापक जिलानी पटेल, पर्यवेक्षक भिमराव माने उपस्थित होते. व्याहूर्ती होमाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
प्रारंभी विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. गिरीजा राजीमवाले म्हणाल्या, कर्तव्यनिष्ठा, लोककल्याण, सेवा, प्रेम हीच सोनामातांची शिकवण आहे. स्त्री ही समाजातील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थिनींनी मनाने आणि शरीराने सुदृढ राहणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी योग्य आणि आवश्यक आहार घ्यावा. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले पोषक घटक घ्यावेत. संतुलित आहार, ताजे अन्न, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेतल्यास शरीर आणि मन सुदृढ राहील, असेही डॉ. राजीमवाले यांनी सांगितले. याप्रसंगी आई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुजाता मयाचारी यांनी परिचय करून दिला. सुरेखा लादे यांनी सूत्रसंचालन तर मोहन कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.





















