बार्शी – महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाच्या ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान’ अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्याने जामगाव येथील एम.आय.टी. इंजिनिरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रम शुक्रवारी दुपारी झाला. यात अंमली पदार्थांच्या विविध प्रकारांची माहिती, त्यांच्या सेवनाने होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम, युवकांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेची कारणे, व्यसनापासून बचावाचे उपाय आणि एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत (१९८५) दंडनीय तरतुदी यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला. सेवन, बाळगणे, वाहतूक, विक्री किंवा प्रोत्साहन देणे हे गंभीर गुन्हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांना संशयास्पद व्यक्ती, हालचाली किंवा अमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली. तसेच ‘व्यसनमुक्त युवा – सुरक्षित भारत’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुमारे २०० विद्यार्थी, प्राध्यापक व इतर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी कार्यक्रमाचे समन्वय साधले.
Post Views: 16