बार्शी – इस्लाम धर्मातील पवित्र मोहरमनिमित्त शुक्रवार, दि. २६ जून रोजी बार्शी शहरातील मानाच्या झेंडेवाली सवारी आणि लिंबूवाली सवारी यांच्या पारंपरिक मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. या सवारी (ताबूत) विसर्जन मिरवणुकांमध्ये हिंदू – मुस्लिम समाजाने खांद्याला खांदा लावून सहभाग घेतल्याने बार्शीच्या सामाजिक सलोखा आणि सांप्रदायिक ऐक्याची उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या झेंडेवाली सवारीला तसेच जवळपास १३० वर्षांची परंपरा असलेल्या लिंबूवाली सवारीला हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. झेंडेवाली सवारीशी हिंदू समाजाचा सहभागही तितकाच उल्लेखनीय राहिला आहे. बार्शीतील भगवान काटकर यांनी सलग ५५ वर्षे सवारी वाहण्याचा मान मिळवला होता, तर मागील ४१ वर्षांपासून मियाॅंभाई सय्यद हे सवारी वाहण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. लिंबूवाली सवारी वाहण्याचा मान सध्या बिलाल शेख यांच्याकडे असून अबू तालीब शेख, हाजी सलीम पठाण, गफार पठाण, अजीम पठाण, महादेव देशमुख, कुदळे व गाढवे परिवार यांच्यासह अनेक सेवेकरी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतात.
Post Views: 10