पंढरपूर – रक्षाबंधन सण येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सासरी असलेल्या अनेक महिला आपल्या भावास परगावी रक्षाबंधन सणानिमित्त राखी पाठवुन देत असतात. बहिणींनी पाठविलेली राखी सुरक्षितपणे आणि वेळेत भावापर्यंत जावी यासाठी पोस्ट विभागाने खास रक्षाबंधन पाकीट विक्रीसाठी आणले आहे. या पाकिटास महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे सहाशे पाकिटांची आत्तापर्यंत विक्री झाली असल्याची माहिती पंढरपूर पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड यांनी दिली.
दरम्यान रक्षाबंधन पाकिटाची किंमत केवळ बारा रुपये इतकी असून साध्या पद्धतीने परगावी राखी पाठविण्यासाठी फक्त पाच रुपयाचे तिकीट त्यावर लावावे लागते. तसेच ही राखी जलद गतीने भावापर्यंत पाठवावयाची असल्यास पोस्ट कार्यालयाकडून स्पीड पोस्ट सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पीड पोस्ट सेवेसाठीचे शुल्क ६७ रुपये इतके असून राखी पाठविण्यासाठीच्या आकर्षक पाकिटाची किंमत बारा रुपये असे एकुण ७९ रुपये परगावी असलेल्या आपल्या लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी बहिणींना खर्च करावे लागणार आहेत.
रक्षाबंधन सण येत्या २८ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. हा सण आता केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात देखील विविध आकाराच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. दरम्यान अनेक महिला राखी खरेदी करून परगावी असलेल्या आपल्या भावास वेळेत आणि खात्रीशीररित्या राखी मिळावी यासाठी पोस्ट कार्यालया मार्फत ती पाठविण्यासाठी पोस्ट कार्यालयात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे.
————————–
चौकट : ( केवळ एक हजार पाकिटेच उपलब्ध )
पंढरपूर येथील पोस्ट कार्यालयामध्ये रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सुमारे एक हजार पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. केवळ चार दिवसांमध्ये यातील सहाशे पाकिटांची आत्तापर्यंत विक्री झाली आहे. प्रत्येक वर्षी पोस्ट कार्यालयाकडून आकर्षक आकारातील पाकिटे उपलब्ध करून दिली जात आहे. त्यास महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Post Views: 3