सांगोला – महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने श्रीराम महिला भजनी मंडळ, सांगोला यांच्यातर्फे श्रीराम मंदिर सांगोला येथे पारंपरिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मंडळातील ज्येष्ठ महिलांसह नूतन युवा पिढीने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने परिसरावर असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे, वरुणराजाने प्रसन्न होऊन भरपूर पाऊस पडावा आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, या मंगल भावनेतून या भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. गजराजाला साकडे घालत महिलांनी निसर्गाकडे भरभरून पावसाची आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना यावेळी केली.
पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांनी श्रीराम मंदिराचा परिसर आनंदमय झाला. ज्येष्ठ महिलांनी आपल्या आठवणी आणि पारंपरिक गाण्यांचा ठेवा नव्या पिढीसमोर उलगडला, तर युवा पिढीनेही उत्साहाने त्यात सहभाग घेतला. ज्येष्ठ आणि युवा पिढीचा हा सुंदर संगम म्हणजे संस्कृतीच्या संवर्धनाचा आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरेच्या जतनाचा एक आनंदसोहळाच ठरला. भोंडला हा केवळ गाण्यांचा आणि फेर धरण्याचा उत्सव नसून निसर्ग, शेती, पाऊस आणि समृद्ध जीवन यांच्याशी जोडलेली लोकपरंपरा आहे. ग्रामीण जीवनात पावसाला आणि धान्यसमृद्धीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व या सोहळ्यातून प्रकर्षाने जाणवले. निसर्गाने भरभरून द्यावे, शेतशिवार हिरवेगार व्हावे, शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावे आणि प्रत्येक घरात सुख-समाधान नांदावे, हीच भावना या उपक्रमामागे होती. परंपरेचा वारसा जपत, निसर्गाकडे समृद्धीचे साकडे घालत आणि ज्येष्ठ-युवा पिढीला एकत्र आणत श्रीराम महिला भजनी मंडळाने आयोजित केलेला हा भोंडला सोहळा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर आविष्कार ठरला.
चौकट-
भरपूर पाऊस पडू दे, सुपाएवढ्या कणसासारखे सुख सर्वत्र नांदू दे आणि दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी गजराजाकडे करण्यात आली.
Post Views: 5