सोलापूर : विवाहसंस्था ही केवळ सामाजिक व्यवस्था नसून सम्यक चारित्र, परस्पर निष्ठा, संयम आणि कर्तव्यभावनेवर आधारलेला पवित्र संस्कार आहे. दांपत्यांनी धार्मिक मूल्यांचे पालन करून आदर्श जीवन जगावे, तर विद्यार्थ्यांनी सदाचार, शिस्त आणि नैतिकतेची कास धरून संस्कारमय जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन मुनीश्री १०८ सुप्रभसागरजी महाराज यांनी केले. या वेळी मुनीश्री प्रणतसागरजी महाराज आणि क्षुल्लकश्री विप्रज्ञसागरजी महाराज यांनीही दांपत्यांना वैवाहिक जीवनात एकनिष्ठ राहण्याचा संकल्प दिला.
वालचंद शिक्षण समूहात आयोजित या धार्मिक कार्यक्रमात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री चंद्रप्रभू विधान संपन्न झाले. या वेळी ५१ दांपत्यांची पुनर्संकल्पित करण्यात आली. सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष ‘गुरुमंत्र’ संस्कार सोहळ्यात ३०० विद्यार्थ्यांना मंत्रसंस्कार देण्यात आले. सदाचार, शिस्त आणि निष्ठेने जीवन जगण्याचा संकल्प या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
जैन धर्मतत्त्वज्ञानात ‘सम्यक चारित्र’ या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देव, गुरु आणि शास्त्र यांच्यावरील श्रद्धा दृढ ठेवून अहिंसा, संयम, सत्य आणि सद्भावना या मूल्यांचे आचरण करणे म्हणजे सम्यक चारित्र होय. धार्मिक विधी केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील आध्यात्मिक आणि नैतिक विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवावेत, असे महाराजांनी सांगितले.
दांपत्य जीवनात परस्पर विश्वास, आदर, निष्ठा आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याची भावना महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि नैतिक मूल्यांचे पालन करून सकारात्मक जीवनदृष्टी विकसित करावी. ज्ञानाला सदाचरणाची जोड मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते आणि कुटुंबासह समाजाचीही प्रगती साधली जाते, असा संदेश महाराजांनी दिला.
या प्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, सौ. माया गांधी, विश्वस्त पराग शहा, वैभव गांधी, ब्रिजेश गांधी तसेच समूहातील सर्व प्राचार्य उपस्थित होते.




















