सोलापूर – नसरापूर मध्ये चिमुकली वर 65 वर्षीय वृद्धाने अमानुष अत्याचार केला व तिचा जीव घेतला. प्रशासन जर कारवाई करणार नसेल तर अश्या हैवणाला ठेचून काढण्याचा जनतेला अधिकार द्यावा तरच समाजामध्ये घाणेरड्या वृत्तींना आळा बसेल असे मत उपस्थित असलेल्या संतप्त महिलांनी व्यक्त केले. यानंतर पीडितेला न्याय मिळण्यासाठी चौपड विठ्ठल मंदिर येथून, राजवाडे चौक, नवी पेठ, शिंदे चौक व शेवट चौपड विठ्ठल मंदिर या मार्गावर हातात डिजिटल फलक घेत कॅन्डल मार्च काढण्यात आला.
सोमवारी सायंकाळी चौपाड विठ्ठल मंदिर येथे लहान मुली, महिला व नागरिक एकत्र येत तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करून झालेल्या घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासनाने लवकरात लवकर पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा त्याला आम्ही आमच्या हाताने ठेचून काढू. वेळोवेळी मुली, महिलांवर असे प्रकार घडत आहेत. ही बाब चिंतेची आहे. याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत तेथील महिलांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सपाटे, अमर पाटील, विनायक महेंद्रकर, पंचांग कर्ते मोहन दाते, विजय पुकाळे, अमर कुलकर्णी, लहान मुली, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूरला बदलापूर सारखा बदला हवा
बदलापूर येथे चिमुकलीवर एका व्यक्तीने अत्याचार केला होता. त्यावेळेस माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने त्या नराधमाला शिक्षा दिली होती. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याही नराधमाचा एन्काऊंटर करून शिक्षा देणे गरजेचे आहे. सोलापूरला बदलापूर सारखा बदला हवा आहे.
– नगरसेवक अमोल शिंदे
सोलापूरच्या नातीला न्याय मिळाला पाहिजे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे. कुठे तर आपण चुकतोय, न्यायव्यवस्था चुकतेय. त्यांच्या आई-वडिलांना किती वेदना होत असतील. जोपर्यंत सोलापूरच्या नातीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
– आ. विजयकुमार देशमुख
नातू विचारतोय त्याने काय केले
माझा नातू मला विचारतो की त्याने काय केले. बलात्कार केले म्हणजे काय केले. त्याला का मारायचे. त्याला शिक्षा काय करायची हे आम्ही सांगू शकत नाही. अशा घटना थांबल्या पाहिजेत.
– पंचाग कर्ते मोहन दाते

























