सोलापूर : अभय योजनेअंतर्गत थकीत भाडे वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणे आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाचे पालन न केल्याने सोलापूर महानगरपालिकेतील भूमि व मालमत्ता विभागाच्या दोन पथकांतील नऊ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी करण्यात आली आहे. मनपा गाळे भाडे थकबाकी वसुली मोहीम शनिवार-रविवारीही राहणार आहे. अभय योजनेस १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अभय योजनेअंतर्गत गाळेधारकांना थकीत भाड्यावरील शंभर टक्के दंड माफी देण्यात आली असून, सप्टेंबरपर्यंत थकीत भाडे वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ठेवले आहे. भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करत पथकांनी दररोज पाच गाळे सील करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, १८ आणि २० ऑगस्ट रोजी संबंधित पथकांकडून हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.लँड फी पथकातील पाच तर मेजर गाळे पथकातील चार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, महसूल वाढीसाठी आता शनिवार-रविवारीही विशेष वसुली मोहीम राबविण्याचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. सुट्टीच्या दिवशीही पथकांनी मैदानात उतरून लक्ष्यपूर्ती करावी, अन्यथा शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी
१ जुलै २०२६ पासून आतापर्यंत अभय योजनेअंतर्गत ८५५ गाळेधारकांचा ५८ लाख ८३ हजार ४५ रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे. मिनी शॉपिंग सेंटरमधील ६५३ गाळ्यांपैकी १२३ गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुमारे ४२ लाख ८६ हजार रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच १२ लाख रुपयांची दंडमाफी देण्यात आली असून २१ गाळे सील करण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
—-