सोलापूर – जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व बार्शी टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भव्य स्वरूपात “चॅम्पियन्स मेगा टेबल टेनिस लीग २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ६ व ७ जून २०२६ रोजी पार्क स्टेडियम, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाला अधिक चालना देणे, खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण करणे आणि त्यांना उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळवून देणे हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आणि परिसरातील निवडक ८० गुणवंत खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचे १६ संघांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक संघात अनुभवी तसेच उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असल्याने स्पर्धेतील प्रत्येक सामना रोमांचक आणि चुरशीचा होणार आहे.
या स्पर्धेचे ट्रॉफी प्रायोजक डॉ. नीलकंठ पोतदार असून त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच डॉ. नितीन तोष्णीवाल आणि डॉ. भास्कर पाटील यांनी आर्थिक सहाय्य देऊन स्पर्धेला बळकटी दिली आहे. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राजीव प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्पर्धेचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची जबाबदारी सोलापूर जिल्हा टेबल संघटनेचे टेनिस सचिव झेड. एम. पुणेकर आणि गणेश स्वामी यांनी स्वीकारली असून त्यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा यशस्वीपणे साकार होत आहे.
ही लीग केवळ एक स्पर्धा नसून सोलापूर जिल्ह्यातील टेबल टेनिसच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून खेळाडूंना नवीन संधी, स्पर्धात्मक अनुभव आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे. आगामी काळात ही लीग राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व टेबल टेनिस प्रेमी, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे व या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
Post Views: 6