नवीन नांदेड – दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांचे शिवनेरी हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्य जनतेचा आधार बनावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त करतानाच जात , धर्म, पंथ अथवा कुठलीही भेदभाव न बाळगता सर्वसामान्यांचे प्रश्न या कार्यातून सोडवली जावेत असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना.एकनाथराव शिंदे यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नांदेड येथील हिंगोली गेट परिसरात आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या शिवनेरी या जनसंपर्क कार्यालयाचे आज सायंकाळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी आ. हेमंत पाटील , आ . आनंदराव बोंढारकर, आ. बालाजीराव कल्याणकर,आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले की, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्ही आनंदराव बोंढारकर यांना निवडून दिला आहात. आनंदराव हे या भागाचे आमदार म्हणून विधानसभेत आपले प्रश्न मांडत आहेत. ते प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून ते आमदार म्हणून निवडून आले. आता आमदार बोंढारकर यांच्यासह मी ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे नांदेड दक्षिण मध्ये विकासाची सर्व कामे नेटाने होतील .जनतेचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास ही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यास शिवसेनेचे आजी-माजी लोकप्रतिनिधी , पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
















