सोलापूर – नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने गुरुवारी (दि. २३) जिल्हा परिषदेच्या पूनम गेट परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि विद्यार्थीहिताची करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांच्या राजीनाम्याशिवाय आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाल्याशिवाय हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा दिला.
आडम यांनी पुढे सांगितले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर लाठीमार करणे, अश्रुधूराचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी बाब असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने क्रांतिकारी गीतांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत वातावरण तापवले. या आंदोलनात माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य एम. एच. शेख, जिल्हा सचिव युसूफ शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, व्यंकटेश कोंगारी, विक्रम कलबुर्गी, अतुल फसाले, मल्लेशम कारमपुरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.
Post Views: 12