सोलापूर – पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातील रिक्त पदांची यादी तातडीने जाहीर करून भरती प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भरती प्रक्रियेकडे राज्यातील हजारो तरुणांचे लक्ष लागले आहे.
पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीसंदर्भात संबंधित आस्थापनांना आवश्यक मार्गदर्शन न मिळाल्याने अद्यापही रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टल वर अपलोड करण्यात आलेली नाही. तसेच बिंदूनामावली, संचमान्यता आदी प्रशासकीय बाबीही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, न्यायालयीन निकालानंतर आता शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव नम्रता चव्हाण यांनी हा विषय येत्या चार ते पाच दिवसांत मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चेला घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
राज्य शासनाने दि. ११ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने दि. २० फेब्रुवारी रोजी पुढील कार्यवाहीबाबत निर्देश जारी केले आहेत.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्हा परिषदांना आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली होती. वित्त विभागाच्या मान्यतेनुसार रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठीही मोठी रोजगार संधी निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुरू झाल्यास स्थानिक उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया सुरू झाल्यास नवीन संचमान्यतेनुसार रिक्त, अतिरिक्त व समायोजन प्रक्रिया पूर्ण करून उर्वरित सर्व पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत. त्यामुळे सर्व उमेदवारांना न्याय मिळेल.
– प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पवित्र पोर्टल शिक्षक भरती
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता न्यायालयीन अडथळे दूर झाल्याने सरकारने कोणताही विलंब न करता निश्चित वेळापत्रक जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
– तुषार देशमुख, अध्यक्ष, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र


























