सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यातच भीषण दुष्काळाचे सावट गडद झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने आणि पावसाअभावी भूजल पातळी खालावल्याने तालुक्यातील शेकडो विहिरी आणि कूपनलिकांनी (बोअरवेल) तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांना चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे अनेक जनावरांची उपासमार सुरू झाली आहे. अनेक पशुपालक कर्नाटकाच्या सीमावरती भागातून चारा खरेदी करून जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहेत. खरीप हंगामात पेरणी केलेल्या मक्याची सध्या ४० ते ५० हजार रुपये एकराने विक्री सुरू असून यामुळे जनावराला हिरवा चारा उपलब्ध करून देणे त्रासदायक ठरत आहे.
खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी जळून गेल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता पाण्याच्या दुर्भिक्ष्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. अनेक गावांमध्ये केवळ १ ते २ बादल्या पाण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकर किंवा दोन-तीन किलोमीटर अंतरावरील विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यातील मंद्रूप भंडारकवठे, कंदलगाव , औराद, हत्तुर यासह इतर मोठ्या गावामध्ये हदवाढ भागातील कुपनलिकांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुष्काळाचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसत आहे. हिरवा चारा आणि कडबा उपलब्ध नसल्याने आणि चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. चारा व पाणी टंचाईमुळे काही भागात लाख रुपये किंमतीचे दुभते पशुधन अवघ्या ३० ते ४० हजार रुपयांना विकण्याची नामुष्की पशुपालकांवर आली आहे. कर्नाटक सीमावरती भागात हिरवा चारा स्वस्त असल्यामुळे दक्षिण तालुक्यातील बहुतांश शेतकरी कर्नाटकातील हिरवा चारा आणत आहेत.
…..
चौकट
….
“दक्षिण सोलापूरात दुष्काळाची दाहकता कमालीची वाढली आहे. हत्तूरसह परिसरातील विहिरी, बोअरवेल पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. माणसाला पिण्यासाठी पाणी नाही आणि शेतकरी जनावरे कवडीमोल भावाने विकत आहेत. प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि ४८ तासांत प्रत्येक गावात टँकरने पाणी पोहोचवावे, अन्यथा शेतकऱ्यांचा तीव्र उद्रेक होईल.”
श्रीकांत भरले ,
सामाजिक कार्यकर्ते, हत्तुर
…
” यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम धोक्यात आला आहे . पावसा अभावी कोणत्याही पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. शिवाय ऐन सणात ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. पशुधन धोक्यात आले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर टँकर सुरू करावेत आणि चारा छावण्यांचे तातडीने नियोजन करावे.”
सोनाली कडते, जिल्हा परिषद सदस्य, मंद्रूप
….
सध्या माझ्याकडे चाळीस जनावर आहे. त्यांना दूध उत्पादन न पाहता दररोज 20 किलो प्रमाणे चारा देत आहे. जनावरांच्या पाण्यासाठी दररोज दोन हजार रुपयांचे पाणी विकत घेत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाई दूर होत आहे. चाराही पंधरा दिवस ते एक महिनाभर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई सह चारा टंचाई निर्माण होणार आहे . म्हणून शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू करावे.
राजू घाटे, पशुपालक, मंद्रूप



















