सोलापूर – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करणे, प्रलंबित कामांना गती देणे आणि आगामी कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समित्यांच्या मासिक सभा पार पडल्या. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमध्ये आर्थिक बाबी, सुरू असलेली विकासकामे आणि आगामी नियोजनाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला.
अर्थ समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबी, नवीन व सुरू असलेली विकासकामे तसेच विविध प्रशासकीय विषयांवर चर्चा झाली. विकासकामांसाठी आवश्यक आर्थिक नियोजन आणि संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपलब्ध आर्थिक संसाधनांचा विकासकामांसाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, लखन शिंदे, चरण चवरे, प्रवीण तानवडे, सचिन जाधव, वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बांधकाम समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध बांधकामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि आगामी काळातील नवीन विकासकामांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच रखडलेल्या कामांचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याने कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.
या सभेस जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, अतुल पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असिफ खैरदी, कार्यकारी अभियंता अतुल लेंढवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 11