सोलापूर : पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी नाला क्रमांक ४-अ, ४-ब, निरंजन नगर, वज्रेश्वरी नगर तसेच एमआयडीसी परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
महापौर कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नाल्यांची सद्यस्थिती, पाण्याचा प्रवाह, गाळ साचलेली ठिकाणे तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात सभागृहनेते नरेंद्र काळे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगर अभियंता सारिका आकूलवार, गोकुळ चितारे, चंद्रकांत गुंडे, अभिषेक चिंता उपस्थित होते.
ज्या ठिकाणी गाळ, कचरा किंवा अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा बाधित होत असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणी तातडीने साफसफाई करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यात कोणत्याही भागात पाणी साचणार नाही, यासाठी नाल्यांची नियमित पाहणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत ठेवावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.
यावेळी महापौरांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारींवर महापालिका प्रशासनामार्फत त्वरित उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Post Views: 6