सोलापूर – वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचा समाजकार्य विभाग, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स एज्युकेटर्स आणि इंडियन नेटवर्क ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समाजकार्य पंधरवडा २०२६’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दुहेरी ज्ञानोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला.
पीपीटी सादरीकरणातून संविधानाचा अभ्यास
‘भारतीय संविधान’ या विषयावर पीपीटी सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. निशा वाघमारे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून चंदेले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मोरे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील विविध कलमांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. डॉ. संतोष कोटी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि मानवी हक्कांबद्दल सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली.
——
फलक सादरीकरणातून सर्जनशील अभिव्यक्ती
पंधरवड्याअंतर्गत भारतीय संविधानावर आधारित फलक सादरीकरण स्पर्धा पार पडली. या प्रदर्शनाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. पी. जोशी हे होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. निशा वाघमारे यांनी समता आणि समानता या मूल्यांचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. डॉ. जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात, “जे संविधान तुम्हाला समजले आहे, ते समाजालाही समजावून सांगा,” असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेतून संविधानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
———
या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांप्रती आदर व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. निशा वाघमारे, प्रा. डॉ. अभय जाधव आणि प्रा. डॉ. जितेंद्र गांधी यांनी केले. यात समाजकार्य पदव्युत्तर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.



















