मोडनिंब – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे माजी आमदार बबनराव शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी भेट घेऊन माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील सीना-माढा उपसासिंचन योजनेच्या दुरुस्तीच्या व नव्याने समाविष्ट गावातील कामांसाठी 350 कोटींच्या वाढीव तृतीय सुप्रमेला मंजुरी व खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेसाठी 160 कोटीं निधीसह वीजेच्या समस्या आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इतरही काही प्रश्न सोडविण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली असता त्यांनी ही सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभी पिके व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते त्याची नुकसानभरपाई तातडीने मिळावी.सीना-माढा उपसासिंचन योजनेत समाविष्ट तुळशी,बावी, परितेवाडी,अंजनगाव खेलोबा,पिंपळखुंटे,अंबाड व कुर्डू या गावांसाठी उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी वाढीव सुप्रमा 350 कोटींची मागणी केली आहे.सीना नदीवरील कुंभेज-खैराव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातून कार्यान्वित होणाऱ्या मानेगाव उपसासिंचन योजनेसाठी 160 कोटीची मागणी केली आहे.या दोन्ही योजनांसाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.याचबरोबर मतदारसंघातील तुळशी,करकंब,बार्डी, जाधववाडी,बैरागवाडी,घोटी, परितेवाडी,परिते,वरवडे व आहेरगाव या सगळ्या भागांसाठी बेंबळे येथील बंधार्यातून जे पुराचे अतिरिक्त पाणी वाहून जाते तेथे बॅरेज बांधून नवीन लिफ्ट द्वारे पाणी उचलून ह्या सगळ्या गावांतील जेवढे पाझर तलाव,ओढे व नाले आहेत ते भरण्यासाठी नवीन उपसासिंचन योजनेची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी तातडीने या नवीन योजनेसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील जेवढे महावितरण कंपनीचे लिंक लाईनचे विषय आहेत त्या लिंक लाईनच्या विषयाच्या संदर्भात सर्व विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी व बावी येथील सबस्टेशन व माळशिरस तालुक्यातल्या जांभूड सबस्टेशन या दोन्ही ठिकाणची सबस्टेशन मार्गी लावण्यासाठी पत्र दिले आहे.सध्या माढा शहरासाठी जी पाण्याची अडचण व टंचाई चालू आहे त्यासंदर्भात पाणीपुरवठा योजनेचा जो प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे त्यास 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे मागणी केली असता लवकरच निधी मंजूर केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपुर व महाळुंग येथे शेती महामंडळाची जी जमीन आहे त्या जमिनीपैकी एक हजार एकर जमीन जी पूर्वीची शासनाची जमीन आहे त्या जमिनीमध्ये नवीन एमआयडीसी मंजूर करण्याची मागणी केली असता आवश्यक ती माहिती घेऊन त्यास मंजूरी देतो म्हणून सांगितले आहे.सध्या माढा तालुका व विधानसभा मतदारसंघात भयंकर दुष्काळ पडला आहे त्यावर उपाययोजना व सवलती तातडीने देण्याची मागणी केली असता त्याही बाबतीत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.



















