जालना : मालकी हक्काच्या लढ्यासाठी सौ. जयश्री संजय कटके यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आता बाराव्या दिवशी पोहोचले असून त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
कटके यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी व सुरेश मालपाणी यांनी गुंडांच्या मदतीने त्यांच्या जागेवरील सामानाची तोडफोड केली, बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर जीव घेण्याचाही प्रयत्न झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतःच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, १२ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार की नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
उपोषणाचा तेरावा दिवस सुरू होत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
























