सोलापूर – कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडीचा समावेश असल्याने यातील कविता हृदयात स्थिरावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अॅम्फी थिएटर मध्ये रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द गायिका सन्मिता धापटे- शिंदे होत्या.
शेकडो वर्षाची मराठी साहित्याची परंपरा मराठीचे वैभव आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यत पोहोचले पाहिजे. रेणुका महागांवकर यांच्यासारख्या गृहणींकडून कविता लिहल्या जातात आणि सातासमुद्रापार असलेल्या तरूण तरूणींकडून वाचल्या जातात यातच या हृदयस्थ काव्य संग्रहाचा सन्मान आहे. पुर्वीच्या काळात घरात शेतात काम करताना कविता तयार होत होत्या घराघरात बहीणाबाई होत्या परंतु आजच्या काळात क्रॉक्रीट आणि माती असा समाजात दुरावा निर्माण झालेला आहे. मराठी अभिजात करायची असेल तर प्रत्येकाच्या घरात पुस्तके असली पाहिजेत असेही कवी अशोक नायगांवकर यांनी सांगितले. पुस्तकांचा भांडार असलेल्या या लोकमान्य टिळक सभागृहाला तीर्थक्षेत्रच म्हणले पाहिजे आणि अशा वास्तुत काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे कौतुक आहे असेही नायगांवकर म्हणाले. प्रमुख पाहुण्या सन्मिता धापटे शिंदे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, कविता लिहणे म्हणजे स्वतःला उलगडत जाणे. कवितामधून रेणुका महागांवकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर आपल्या मनोगतामधून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी काव्यसंग्रह लिहताना कसा अनुभव आला आणि साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील घडामोडी कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले. शब्दात जादू पेरण्याची ताकद कवी मध्ये असते असेही महागांवकर यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवर आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यांचा सत्कार झाल्यानंतर डिजिटल पध्दतीने रिमोटवरील बटण कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते दाबून कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर हृदयस्थ या काव्यसंग्रहातील कविता अमेरिकास्थित मधुरा गोडबोले,शलाका डोळस, कोल्हापूरच्या प्रियांका पाटील, अहिल्यानगरचे गणेश शिंदे आणि सोलापूरची समृध्दी देशपांडे यांनी कवितांचे वाचन केले. त्यानंतर या काव्यसंग्रहासाठी सहकार्य केलेल्या मुद्रीत शोधक केशव सातपुते, मुखपृष्ठ निशांत पोरे, सविता पाटील, गोविंद काळे, मधुकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर आदींसह पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, नगरसेवक सात्विक बडवे, उद्योगवर्धीनीच्या चंद्रीका चव्हाण, शुभम महागांवकर,श्रृती महागांवकर,निशा शहा, रसिका बडवे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी केले.
आमदार अभिजित पाटलांची त्या कवितेला भरभरून दाद
कवी अशोक नायगांवकर यांनी एक कविता सादर केली त्यामध्ये शेवटच्या वाक्यात मला भाजपामध्ये जावंसं वाटतंय अशी ओळ त्यांनी म्हणून कविता पूर्ण केली त्या कवितेला पंढरपूर माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी खळखळून हसून दाद देत जणू मनात असलेलं नायगांवकरांनी बोलून दाखवलं असा प्रतिसाद दिला.
























