सोलापूर – जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने खरेदी करण्यात आलेल्या नव्या वाहनांचा ताफा आज रविवार दि.२८ जून सेवेत दाखल होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध विषय समिती सभापतींना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषदेतील नव्या नेतृत्वाच्या कामकाजाला औपचारिक गती मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दीपक वैद्य, उपाध्यक्ष म्हणून इंद्रजीत पवार तसेच शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी यांनी पदभार स्वीकारून जवळपास तीन महिने पूर्ण होत आले आहेत. मात्र, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र अधिकृत वाहने उपलब्ध नसल्याने वाहन खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यानंतर आता नव्या वाहनांचा ताफा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे.
या प्रक्रियेनुसार अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी महिंद्रा एक्सयूव्ही ७००, तर विविध विषय समिती सभापतींसाठी महिंद्रा बोलेरो वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. या वाहनांमुळे जिल्हाभरातील विकासकामांचा आढावा, ग्रामभेटी, शासकीय बैठका आणि विविध योजनांच्या पाहणीसाठी पदाधिकाऱ्यांना अधिक सुलभता मिळणार आहे.
आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान या वाहनांचे पूजन करण्यात येणार असून, त्यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या संबंधित पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला बार्शीचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
चौकट
वारीपूर्व नियोजनाची महत्वाची बैठक
याच दौऱ्यात पालकमंत्री गोरे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या तयारीचाही सविस्तर आढावा घेणार आहेत. त्यामुळे वाहन वितरणाबरोबरच वारीपूर्व नियोजनालाही या बैठकीत विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
चौकट
साध्या कार्यकर्त्यापासून अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य हे शेतकरी कुटुंबातील साधे व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी त्यांच्याकडे स्वतःची चारचाकी नव्हती. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना अधिकृत वाहन वापरण्याची संधी मिळाली आणि आता प्रथमच त्यांच्या सेवेत नवी अधिकृत चारचाकी दाखल होत आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, जिल्हा परिषदेतील या वाहन वितरण सोहळ्याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post Views: 4