पंढरपूर – पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व सायबर शाखा, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वेरी कॉलेजमध्ये महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा तसेच अमली पदार्थ सेवन प्रतिबंध व जनजागृती या विषयांवर मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न झाले. यासाठी डिप्लोमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सोशल मिडिया, फेसबुक, इंस्टाग्रामच्या पेजवरून मोबाईलच्या माध्यमातून दररोज फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. यातून गुन्हेगारी वाढीस लागल्याचे चित्र मिळत आहे. ज्या वयात हातात वह्या पुस्तके हवीत त्या वयात मोबाईल हातात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ खर्ची पडत आहे. फायदा तर काहीच नाही पण यातून गुन्हेगारी हळूहळू फोफावत चालल्याचे दिसुन येते. याच पार्श्वभूमीवर सायबर शाखा, सोलापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी यांनी ‘महिला सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन’ याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक केशव रणदिवे यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंध आणि युवकांची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. एकुणच तिघाही पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ‘महिला सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन’ आणि अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंध आणि युवकांची जबाबदारी या महत्वाच्या विषयावर स्वेरीत जनजागृती केली. यावेळी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्यासह डिप्लोमा इंजिनिअरिंगचे विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हे मार्गदर्शन सत्र अत्यंत उपयुक्त ठरले. प्रा.सागर घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
Post Views: 16