पंढरपूर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, पंढरपूर आणि ईशुरस फायनान्शिअल कन्सल्टंट्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोहाळी (ता. पंढरपूर) येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात शाळेतील तब्बल १८२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोहाळीचे मुख्याध्यापक मच्छिंद्र जुंदळे सर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल चंदनशिवे, बोहाळी गावचे सरपंच शिवाजी पवार, मोरेवस्ती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव धुमाळ, विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, तसेच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
(१८२ विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी)
शिबिरासाठी डॉ. क्षितिजा कदम पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून विशेष सेवा दिली. त्यांनी शाळेतील १८२ विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची स्वतंत्र नोंद केली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आढळलेल्या विविध आरोग्यविषयक तक्रारी व आजारांची नोंद घेण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना नियमित आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध होत नसल्याने अशा प्रकारचे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या प्राथमिक स्तरावरच लक्षात येऊन त्यावर योग्य मार्गदर्शन व उपचाराची दिशा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
(निरोगी जीवनशैलीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन)
यावेळी बोलताना विठाई संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विठाई संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. क्षितिजा कदम पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या दैनंदिन सवयी, वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार आणि आरोग्याची नियमित तपासणी याबाबत मार्गदर्शन केले. आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून आवश्यक उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षक, संस्थेचे सदस्य व स्वयंसेवकांचे योगदान
शिबिर यशस्वी करण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळा, बोहाळी येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सदस्य डॉ. सचिन लादे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय टोणपे, ओंकार कापसे, महानंदा डोंबाळे, दिपाली सतपाल, भाग्यश्री लिहिने, रामेश्वर कोरे आणि अंजली सूनगार यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील प्रज्ञा कुलकर्णी, वंदना कथले, सिद्धेश्वर हिप्परकर, दत्तात्रय येडगे, सुनील अडगळे, हनुमंत ढोपे व सुप्रिया वाघमारे या शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी विठाई संस्था व ईशुरस फायनान्शिअल कन्सल्टंट्स प्रा. लि. यांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
CSR उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेले हे शिबिर सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण ठरले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला या उपक्रमामुळे निश्चितच चालना मिळाली आहे.
Post Views: 7