धाराशिव : पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात दाखल होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घाटणे बंधारा येथून तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पाणी पोहोचविण्यासाठी युधपातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष पाणी जिल्ह्यात येईल या दृष्टीने पुढील २० दिवसात कालबद्ध पद्धतीने उर्वरित सगळी कामे पूर्ण करण्याचे संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या संयुक्त बैठकीत ठरले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक २ अंतर्गत घाटणे बॅरेज ते रामदरा साठवण तलावापर्यंचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून प्रकल्प भौतिकदृष्ट्या १०० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घाटणे ते पडसाळी (ता. मोहोळ) तसेच पांगरदरवाडी ते सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील पंपगृह, उर्ध्वगामी नलिका आदी कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तसेच पाहणीनंतर सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावाही घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पातील स्थापत्य व यांत्रिकी विभागाची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. विद्युत विभागाचीही सुमारे ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ७२ किलोमीटर विद्युत वाहिनीपैकी केवळ ७०० मीटर काम आजघडीला बाकी असून ते देखील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ट्रान्समिशन लाईनच्या आवश्यक परवानग्या घेऊन १५ ऑक्टोबरपर्यंत चाचणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. वेळापत्रकात कोणताही विलंब होऊ नये, अशा सक्त सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत सुमारे ६० किलोमीटरचा पाण्याचा प्रवास होणार आहे. २७,९१६ अश्वशक्ती क्षमतेच्या पंपांद्वारे पाणी उचलून १५.४२ किलोमीटर उर्ध्वगामी नलिका आणि ३९.९४ किलोमीटर कालव्याद्वारे ते पुढे नेले जाणार आहे. पांगरदरवाडी, सिंदफळ आणि रामदरा या साठवण तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मोठा आधार मिळणार आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्प हा धाराशिवच्या भविष्यातील पाणी सुरक्षेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उर्वरित सगळी कामे नियोजित कालावधीत तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रामदरा ठरणार आधारवड!
उजनी धरणातून भीमा-सीना जोड बोगद्याद्वारे कृष्णेचे पाणी सीना नदीत येईल. पुढे हेच घाटणे बॅरेज आणि तेथून पांगरदरवाडी, सिंदफळ ते रामदरा तलावात येणार आहे. रामदरा तलावाची २० द.ल.घ.मी. एवढी पाणी साठवण क्षमता आहे. तीव्र पाणीटंचाईच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा आपल्याला वापर करता येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही टँकरद्वारे रामदरा तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीनेच हे नियोजन करण्यात आले आहे. अवर्षणाच्या कालावधीत रामदरा तलाव जिल्हावासियांसाठी मोठा आधारवड ठरणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 8