सोलापूर – महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सोलापूर विभागाच्या वतीने महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्याबाबत व इतर मागण्यांचे निवेदन विधानसभेचे आमदार राजेंद्र राऊत यांना प्रत्यक्ष भेट देऊन देण्यात आले. यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना सातव्या वेतन आयोगानुसार शासनाने लागू केली आहे; परंतु इतर सर्व विभागात ही योजना सुरू असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांना ती अद्याप लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही योजना राज्य सार्वजनिक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत, अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे.
तसेच, प्रयोग शाळा सहायक यांच्या सोलापूर विभागातील सहसंचालक ऑफिसमधून चुकीची वेतन निश्चिती करून त्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून, ग्रेड वेतन २४०० ऐवजी २००० देण्यात आले आहे. इतर सर्व विभागीय सहसंचालक ऑफिसमधून ग्रेड वेतन २४०० देण्यात आले असले तरी केवळ सोलापूर विभागातील प्रयोगशाळा सहायक यांना ते दिले नसल्याने, याबाबत योग्य तो लाभ मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना अवगत करावे, अशी विनंतीही करण्यात आली.
या शिष्टमंडळात व भेट दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा सचिव भिमा मस्के, कार्यकारिणी सदस्य शरद मस्के, रामराजे सुरवसे, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्य अभिमान ढगे, शिवाजीराव हाके, दीपक शिर्के, लांडगे भाऊ, दत्ता जगदाळे, संतोष करंजकर, खेत्री, कुमार जाधव, मोरबाळे सर, गणेश फफाळ, आनंद देशमुख, सुरेंद्र राऊत, कैलास चव्हाण, विजय दास, बिरू गाढवे आदी कर्मचारी उपस्थित होते.
——
























