सोलापूर : संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि कलात्मक दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला सोलापूर शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेला रंगांची सुंदर जोड देत आकर्षक चित्रे साकारली. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण स्पर्धेचे वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले होते.
या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संभाजी आरमार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नितीन खिलारे, यशवंत बिराजदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे परीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट कलाकृती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, सागर ढगे, राज जगताप, सागर दासी, महिला संघटनेच्या जिल्हाप्रमुख संध्या हेब्बाळकर, ऍड.गीता पवार, ढगे, प्रदीप मोरे, तेजस चौधरी, सुधाकर करणकोट, प्रवीण मोरे, सचिन लंगाळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते श्रीकांत कदम यांनी केले. प्रास्ताविक अजिंक्य पाटील यांनी केले तर आभार जिल्हा संघटक युवराज चव्हाण यांनी मांडले.
























