
वेळापूर – सोलापूर जिल्ह्यातील महूद येथील केदारनाथ यात्रेकरूंची व भाविकांची सेवा हरिद्वार येथील संजय गुरुकृपा व त्यांच्या कुटुंबियांनी व मित्र परिवारानी केली. महुद येथील मानाच्या शंभू महादेवाच्या कावडीचा आवाज केदारनाथ परिसरात घुमला. तरुण शिवभक्तांनी भक्ती आणि श्रद्धेच्या महादेवाची जोरावर कावड खांद्यावर घेऊन महाकाय गौरीकुंड ते केदारनाथ सुमारे २२ किमी अंतर डोंगर, दरी, कडी-कपारीचा खडतर रस्ता अंगावर बर्फ झेलत दिवस-रात्र पायी चालत ३२ तासांत केदारनाथ मंदिर सर केले.
यावेळी महादेवाची कावड केदारनाथाच्या चरणी लीन होताच शिवभक्तांचा आनंद ओसंडून वाहिला. शिवभक्तांनी हलगीच्या तालावर नाचत “हर हर महादेवाची’ गर्जना करीत शंभू महादेवाच्या कावडीचा श्री केदारनाथला जलाभिषेक (धार) घालून केदारनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.
सुमारे ५० ते ६० तरुण शिवभक्त आवश्यक ते खाण्या-पिण्याचे साहित्य घेऊन चारचाकी वाहनात, तर शंभू महादेवाची कावड दुसऱ्या चारचाकी वाहनात घेऊन केदारनाथला रवाना झाले. चार दिवस अडीच हजार कि.मी. प्रवास करीत शिवभक्त हरिद्वारला पोहोचले. तेथे गंगा नदीत स्नान गंगा मंदिरात कावडीला जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवभक्तांनी गौरीकुंड ते केदारनाथ खांद्यावर कावड घेऊन २२ किमी पायी केदारनाथ मंदिराचे अंतर पार केले. पूर्ण केली.
शिवभक्त बाबूराव नागणे-पाटील, प्रतीक ताटे, ऋषिकेश महाजन, अभिषेक महाजन, हिमालय देशपांडे, विजय बाजारे, रमेश टिंगरे, नाना मेटकरी, बबलू देशमुख, विनायक पळसे, आदी शिवभक्त केदारनाथ कावड यात्रेसाठी सहभागी झाले होते.
















