
मोहोळ – भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे कामगार नेते सुधांशू सुभाष रानडे यांचे एकमताने निवड करण्यात आली. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची पुणे येथे नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत श्री रानडे यांचे निवड करण्यात आली. *रानडे यांच्या निवडीमुळे सोलापूरला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा बहुमान पहिल्यांदाच मिळत आहे*. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण झालेले रानडे हे 1997 ते 1999 या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गोव्यामध्ये कार्यरत होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेमध्ये ते कार्यरत झाले. गेली वीस वर्ष भारतीय मजूर संघ ही देशातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली प्रथम क्रमांकाची कामगार संघटना आहे. जगन्नाथ पुरी येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मजदूर संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट अनिल ढुमणे यांची भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. यावर उपस्थित सहक्षेत्र संघटन मंत्री मोहन येणुरे यांनी सुधांशू रानडे यांचे नाव सुचवले आणि त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली. श्री.रानडे हे गेली 23 वर्ष सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये विविध पदांवर कार्य करत आहेत. याचबरोबर मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा चिटणीस,सहकारी बँक कर्मचारी संघाचे जिल्हा सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बैठकीनंतर सत्काराला उत्तर देताना कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहणार असून त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.






















