सोलापूर – प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय कामकाज, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त आरोग्यसेवा यांच्या आदेशानुसार मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हास्तरीय पथकाने तपासणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरवाड आणि डॉ. अश्फाक सय्यद यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीदरम्यान आरोग्य केंद्राच्या कामकाजातील त्रुटी दूर करून सेवा अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान जिल्हास्तरीय पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यालयीन कामकाज, परिसराची स्थिती आणि आरोग्यसेवेशी संबंधित विविध बाबींची पाहणी केली. ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यात आली. तपासणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे महत्त्वाचे असल्याने आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामकाज, नियोजित आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर याकडे लक्ष देण्याची गरज या पाहणीच्या निमित्ताने अधोरेखित झाली. केवळ त्रुटी निदर्शनास आणून न थांबता त्यावर तातडीने कार्यवाही करून कामकाजात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पथकाने मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारीडॉ. मंजुनाथ पाटील, डॉ. महांतेश खानापुरे यांच्यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्यसेवक, आशा गटप्रवर्तक, परिचर, वाहनचालक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
या तपासणीमुळे आरोग्य केंद्रातील त्रुटी दूर करणे, आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि रखडलेल्या बांधकामाला गती देणे या बाबींवर लक्ष केंद्रित झाले आहे. आता संबंधित यंत्रणेकडून सूचनांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे लक्ष लागले आहे.
चौकट
नवीन इमारतीच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्नही या भेटीदरम्यान उपस्थित झाला. रखडलेल्या बांधकामाबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्यांकडे विचारणा करून आवश्यक सूचना दिल्या. नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण होणे आणि नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होणे या दृष्टीने या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.




















