सोलापूर – विजयादशमी अर्थात दसरा हा सण विजय, आनंद, समृद्धी आणि निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश देणारा सण आहे. या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, या परंपरेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आपट्यासोबतच अंजन आणि कांचन झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे निसर्गाची हानी होते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वृक्षांना नुकसान पोहोचते.
आपटा, अंजन आणि कांचन ही झाडे एकाच वनस्पती कुळातील असल्याने त्यांची पाने दिसायला जुळी वाटतात. याचाच फायदा घेऊन विक्रेते विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी अंजन किंवा कांचनची पाने संबंधित झाडाच्या फांद्या तोडून आपल्याला आपट्याची पाने म्हणून विक्री करतात. या पार्श्वभूमीवर वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर आणि भकालो नर्सरी यांच्याकडून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कांचन झाडे तोडली जाऊ नयेत याकरिता जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत. तसेच या परिसरात कांचनची झाडे तोडण्यास येणाऱ्या नागरिकांना ही झाडे तोडण्यास मज्जाव करण्यात आला असून या झाडांच्या पर्यावरणीय महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर एखादे झाड लावून त्याचे संगोपन व संवर्धन करावे असा संदेश यानिमित्त पर्यावरणप्रेमींना देण्यात येत आहे.
या उपक्रमात WCAS चे अजित चौहान, सोमशेखर पाटील व श्री सिद्धेश्वर मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.




















