जेऊर – श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी ता. करमाळा येथील विषय शिक्षक श्री. मारुती संदिपान साखरे यांची शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्या’त ‘आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे (सर), पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दीड वाजता, तुळजाभवानी लॉन्स, बार्शी नाका, करमाळा रोड, कुर्डूवाडी येथे होणार आहे.
श्री. मारुती साखरे यांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. तसेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडा आणि संस्कार यांना महत्त्व देणारे शिक्षक म्हणून साखरे यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड झाल्याने श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सन्मानामुळे शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याला निश्चितच प्रेरणा मिळणार असून, विद्यार्थ्यांसाठीही हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे.
Post Views: 6