बार्शी – सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.१७ मे रोजी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र यांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीमध्ये आगामी उत्सव, सण, बकरी ईद तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुका शांततापूर्ण, सुरक्षित व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पार पाडण्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा कायम राहावा, अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर प्रसारित होऊ नयेत याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच गावातील संशयित हालचाली, भांडणतंटे, अवैध धंदे, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीदरम्यान ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करुन गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात गावपातळीवर पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी बार्शी तालुका पोलीस ठाणे आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘१ पोलीस पाटील – १ वृक्ष’ या उपक्रमांतर्गत उपस्थित पोलीस पाटील यांना प्रत्येकी एक वृक्ष देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, API दिलीप ढेरे , पीएसआय भालेराव, ASI गवळी, पोलीस हवालदार दशरथ बोबडे, राजेंद्र मंगरुळे, रुपेश शेलार, धनराज केकाण, देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, सुरेश बिरकले, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल तसेच फॉरेन्सिक टीम, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9