
वैराग – निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश देत, आज बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘एकता महिला मंच’च्या वतीने ‘एक गाव – एक वडाचे झाड’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
आज, सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी मानेगाव येथील महिलांनी एकत्र येत, निसर्गाला सर्वाधिक प्राणवायू (ऑक्सिजन) देणाऱ्या वडाच्या झाडाचे पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने पूजन केले. केवळ पूजा अर्चा करून न थांबता, पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प करत या महिलांनी वडाच्या नवीन रोपाचे उत्साहात रोपण केले. या झाडाचे पुढील काळात व्यवस्थित संगोपन करण्याचा निश्चयही यावेळी महिलांनी केला.
सात जन्माच्या सोबतीसह पर्यावरण रक्षणाची प्रार्थना
वटपौर्णिमेचे पारंपरिक महत्त्व जपत उपस्थित सुवासिनींनी वडाच्या झाडाला सुताचे वेढे देत, फेऱ्या मारून “जन्मोजन्मी हाच नवरा मिळो” अशी मनोभावे प्रार्थना केली. एका बाजूला धार्मिक सण साजरा करत असतानाच, दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्यक्ष झाड लावून ‘एकता महिला मंच’च्या महिलांनी समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रमाप्रसंगी एकता महिला मंचच्या पदाधिकारी लक्ष्मी मोरे, संगीता डाके, अश्विनी माळी, सुरेखा डाके आणि स्वाती वाघमारे आदी महिला उपस्थित होत्या.
‘एकता महिला मंच’च्या या अनोख्या आणि निसर्गपूरक उपक्रमाचे मानेगावसह संपूर्ण बार्शी तालुक्यातून भरभरून कौतुक केले जात आहे.
Post Views: 4