पंढरपूर – येथील यमाई तलावालगतची जागा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र यास स्थानिकांसह येथे नियमित फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. यासाठी यमाई तलाव बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील यमाई तलावालगतची सुमारे आठ एकर जागा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी देण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यमाई ट्रॅकवर फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या निधीतून यमाई तलावाची देखभाल केली जाते. तसेच राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, तुळशी वृंदावन, तसेच पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर उभारण्यात आले असून हजारो नागरिक दररोज येथे व्यायाम व विरंगुळ्यासाठी येतात. या तलावावर देशी, विदेशी पक्षी तसेच येथे फळांची आणि औषधी वनस्पतीची दुर्मिळ जुनी झाडे आहेत.
दरम्यान मंदिर समितीकडे वाखरी, गोपाळपूर, देगाव व पंढरपूर तालुक्यात इतरही मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहेत. त्या जमिनीवर गोशाळा उभारणे अधिक योग्य व सयुक्तिक ठरणार अशी भूमिका नागरिकांनी मांडली.
शासनाने भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरात पिकनिक स्पॉट, बोटिंग, सायकल ट्रॅक, ओपन जीम, ऑक्सिजन पार्क व इतर सार्वजनिक सुविधा उभारण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या कारणाने सदर दिलेली मंजुरी तत्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा सरकारच्या या निर्णया विरोधात पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, राजकीय, सामाजिक संस्था व नागरिकांच्यावतीने यमाई तलावच्या बचावासाठी भव्य मोर्चाचे नियोजन करून जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
———————-
चौकट : ( प्रसंगी न्यायालयात दाद मागणार )
दरम्यान याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी योगभवन येथे बैठक पार पडली. यामध्ये प्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
——————
चौकट : ( बुधवारी बैठकीचे आयोजन )
पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना, राजकीय, सामाजिक संस्था व वृक्षप्रेमी,पर्यावरण प्रेमी नागरिक यांना विनंती की,पंढरपूर येथील यमाई तलाव लगतची जागा गोशाळेसाठी मंदिर समितीस देऊ नये म्हणून सरकारच्या या निर्णया विरोधात पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, राजकीय,सामाजिक संस्था व नागरिक वतीने यमाई तलावच्या बचावासाठी भव्य मोर्चाचे नियोजन करून जन आंदोलन उभा करण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी बुधवारी (दि. २४ जून २०२६ ) सकाळी ७ वाजता यमाई तलाव ( तुळशी वृंदावन समोर ) येथे बैठक आयोजित केली आहे तरी सर्व शहरातील नागरिक सामाजिक राजकीय व पर्यावरण प्रेमी यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन यमाई तलाव बचाव समिती पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 9