बार्शी – इंडो ॲथलेटिक सोसायटी (IAS) आयोजित १० व्या पुणे ते पंढरपूर वारी सायकल मोहिमेत फिलिप्स हेल्थकेअरच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत २३५ किलोमीटरचा प्रवास १० तासात यशस्वीरीत्या पूर्ण केला. या मोहिमेत मनोज चोपडे (K2K), सारंग गुलाणे, अरविंद खलाटे, सुशील देवरे, गौरव परब आणि सागर यांनी सहभाग नोंदवत आरोग्य, तंदुरुस्ती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवला.
फिलिप्स हेल्थकेअरमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि फिटनेस संस्कृतीला विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच प्रत्यय या वारी सायकल मोहिमेत आला. कंपनीतील कर्मचारी नियमितपणे सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि विविध मॅरेथॉन तसेच लाँग-डिस्टन्स सायकल राईड्समध्ये सहभागी होत असतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही “IAS टूर द पंढरपूर राईड” या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी सायकलवारीत सहभाग घेण्यात आला. या संपूर्ण मोहिमेचे उत्कृष्ट नियोजन इंडो ॲथलेटिक सोसायटीने, गजानन खैरे, अजित , गणेश भुजबळ व IAS चे सर्व स्वयंसेवक यांनी केले. सहभागींसाठी संपूर्ण प्रवासादरम्यान हायड्रेशन, प्रोटीनयुक्त आहार, वैद्यकीय मदत आणि तांत्रिक सहाय्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या वर्षीच्या मोहिमेतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे अवघ्या १२ वर्षांच्या स्वरद चोपडे (रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी) याने २३५ किलोमीटरचे अंतर सरासरी २३ किमी प्रति तास वेगाने पूर्ण करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्णपणे गेल्या दोन वर्षांपासून. त्याच्या चिकाटी, जिद्द आणि शिस्तबद्ध तयारीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ही वारी केवळ सायकल प्रवास नसून आरोग्य, अध्यात्म, शिस्त आणि सामूहिक सहभाग यांचा उत्सव आहे. फिलिप्स हेल्थकेअरच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
Post Views: 13