सोलापूर : हिंदवी स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास, मावळ्यांचे अतुलनीय शौर्य आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करत ऐतिहासिक पन्हाळगडावर ‘दुर्ग पन्हाळा मशाल महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या महोत्सवात मशालींच्या प्रकाशाने गड परिसर उजळून निघाला.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिष्ठेचा जागर करत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेशही या वेळी देण्यात आला.महोत्सवातील मशाल फेरीची सुरुवात वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी पूजन आणि ध्येयमंत्राने झाली. स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शिवा काशीद यांच्या स्मृतींना अभिवादन करून फेरी पुढे बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाकडे मार्गस्थ झाली. तेथे स्मारकाचे पूजन करून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात पूजन आणि प्रेरणामंत्रांच्या माध्यमातून स्वराज्याच्या विचारांना उजाळा देण्यात आला. अखेरीस श्री अंबाबाई मंदिरात देवीची आरती करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. तोफांची बत्ती देऊन महोत्सवाची सांगता झाली.
शिवा काशीद यांचे बलिदान, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिर्मितीचे ध्येय यांचा जागर करणारी ही मशाल फेरी केवळ एक सोहळा न राहता इतिहासाशी नाते जोडणारा प्रेरणादायी उपक्रम ठरली. मशालींच्या प्रकाशातून स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यात आले.या मशाल महोत्सवात समस्त शिवसेवक परिवार सहभागी झाला होता.
—
Post Views: 12