सोलापूर : “बाह्य जगातील सुखे ही क्षणभंगुर आहेत, मात्र ध्यानातून मिळणारी आत्मशांती ही कायमस्वरूपी असते. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर ती मनाची शुद्धी आणि आत्म्याशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे,” असे प्रतिपादन पूज्य १०८ मुनीश्री वीरसागर महाराज यांनी केले.
शनिवारी येथील श्राविका संस्था येथे मुनीश्रींच्या मंगल सान्निध्यात ‘ध्यान शिबिर’ उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात शिक्षक, कर्मचारी आणि सकल जैन समाजातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मनाची एकाग्रता हाच कल्याणाचा मार्ग
मार्गदर्शन करताना मुनीश्री पुढे म्हणाले की, मनात येणारे वाईट विचार, क्रोध, लोभ आणि मोह यांपासून दूर राहून शांत, संयमी व जागरूक राहणे हेच खरे ध्यान आहे. नियमित ध्यानामुळे मन स्थिर होऊन निर्णयक्षमता वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो. प्रत्येकाने आत्मकल्याणासाठी दैनंदिन जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी काढून ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी अहिंसा, सत्य आणि संयम या त्रिसूत्रीवर चालण्याचा संदेश दिला.
या शिबिरास श्राविका संस्थेच्या सचिव देवई शहा, वरिष्ठ सदस्या दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहळे, राखी देशमाने, स्वाती कांबळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक पोळ सर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान उपस्थितांनी मन:शांतीचा अनुभव घेत ही एक आध्यात्मिक ऊर्जा देणारी पर्वणी असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ सोनटक्के यांनी केले. सौ. प्रगती गांधी आणि मयुरी सोनटक्के यांनी गुरुवंदना सादर केली, तर ऑनलाइन माध्यमातून आलेल्या शंकांचे वाचन पराग शहा यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे, अनुप कस्तुरे, प्रवीण शहा, प्रदीप डेरे, रोहन शहा, सुरज व्हसाळे, सुहास छचुरे, अरिहंत माणिकशेट्टी, अभिनंदन उपाध्ये, अभिजीत पाटील, अनंत बेळ्ळे, प्रवीण कंदले आणि संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भविष्यातही अशा आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी इच्छा उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
















