सोलापूर : हरित वसुंधरा फाउंडेशनच्या ‘हरित सोलापूर’ उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी औ. प्र. संस्थेच्या होस्टेलच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खासदार ज्योती वाघमारे होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सहआयुक्त मा. शशिकांत भोसले, डॉ. सचिन खरात, प्रख्यात चित्रकार व प्राचार्य मनोज बिडकर, हरित वसुंधरा फाउंडेशनचे प्रमुख अमित बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हरित वसुंधरा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विविध स्तरावर वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मा. ज्योती वाघमारे यांनी हरित वसुंधरा फाउंडेशन ला ग्रीन आर्मी संबोधले सोलापूरच्या ग्रीन स्वप्नासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या आश्वासन दिले.मान्यवरांसह उपस्थित सर्व कर्मचारी व नागरिक व त्यांचे पाल्य यांनी प्रत्येकी पाच पाच झाडे लावली आहेत.
सुत्र संचालन सागर मुरडे यांनी केले. आभार युवराज सोडल यांनी मांडले. या कार्यक्रमास गटनिदेशक सिद्राम गोलेकर गटनिदेशक अशोक मिरगणे, ज्येष्ठ शिल्प निदेशक चंद्रकांत जाधव, शिल्पनदेशक राम मुंडे, शिल्प निदेशक विजय देशमुख व कार्यालय अधीक्षक प्रदीप दराडे आदी उपस्थित होते.






















