बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथील बी.पी.एड. विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. शरद अरुण सावळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. शरद सावळे यांनी आपल्या संशोधनासाठी “वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनविषयक अभिवृत्ती विकसनासाठी शारीरिक शिक्षण संशोधन पद्धती कार्यक्रमाचे विकसन व त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास” हा विषय निवडला होता. शारीरिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी आणि संशोधन प्रक्रियेबाबत सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या संशोधनामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधनविषयक अभिवृत्तीचा अभ्यास करुन त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेष संशोधन पद्धती कार्यक्रम विकसित करण्यात आला. तसेच त्या कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचे शास्त्रीय पद्धतीने परीक्षण करण्यात आले. शारीरिक शिक्षणशास्त्रातील संशोधन संस्कृतीला चालना देणारे हे संशोधन भविष्यातील संशोधक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. शारीरिक शिक्षण क्षेत्रातील संशोधनविषयक अभिवृत्ती विकासाच्या दृष्टीने हे संशोधन महत्वपूर्ण ठरले आहे.
प्रा. शरद सावळे यांच्या संशोधन कार्यासाठी बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर येथील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बी. सी. मोहिते यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण झाले.
प्रा. शरद सावळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एम. एस. डिसले, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 16