सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलात प्रशासकीय फेरफार करण्यात आली असून, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शहरातील १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश गुरवारी जारी केले आहेत.
बदली सत्रात अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची अदलाबदल झाली आहे. यात विजापूर नाका, सदर बझार, जेलरोड, एमआयडीसी आणि सलगर वस्ती यांसह विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुहास चव्हाण आणि विकास देशमुख या दोन निरीक्षकांच्या विनंतीनुसार त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, महिला सुरक्षा कक्ष आणि विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.
विजापूर नाका पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून सुहास भाऊराव चव्हाण यांची (विनंतीवरून) नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदर बझार येथील भालचंद्र सुभाष ढवळे यांची सायबर सेलमध्ये बदली झाली असून, आर्थिक गुन्हे शाखेचे अजित शंकर लकडे आता सदर बझार पोलीस ठाण्याची धुरा सांभाळतील. तसेच जेलरोडचे भाऊराव श्रीधर बिराजदार यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर जेलरोड पोलीस ठाण्याचा प्रभार आता उदयनसिंह शामराव पाटील आणि नियंत्रण कक्षातील जयदीप हनुमंत कळेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सलगर वस्ती येथील उमाकांत आनंद शिंदे यांची विशेष शाखेत बदली झाली असून, सायबर सेलचे श्रीशैल सिदरामप्पा गजा हे आता सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे नवीन प्रमुख असतील. त्याचबरोबर विकास दगडोबा देशमुख यांची विनंतीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात (गुन्हे) नियुक्ती करण्यात आली आहे.
Post Views: 12