
सोलापूर – लिटिल चॅम्प १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत कदार विजापूर आणि फैज कादरी संघांनी अनुक्रमे अंबादास पवार आणि रामभाऊ देगावकर संघांवर एकतर्फी विजय मिळवत शानदार कामगिरी केली.
जुळे सोलापूरातील भंडारी मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यात सामन्यात कदार विजापूर संघाने शानदार कामगिरी करत अंबादास पवार संघाचा तब्बल १०० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कदार विजापूरने २६ षटकांत ३ बाद १४० धावांची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात अंबादास पवार संघाचा डाव कदार विजापूरच्या अचूक गोलंदाजीपुढे अवघ्या १४.१ षटकांत ४० धावांवर गारद झाला.
कदार विजापूरच्या समृद्धी चट्टे हिला तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तिने फलंदाजीत ३३ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २९ धावा केल्या, तसेच गोलंदाजीत २ षटकांत २ निर्धाव षटके टाकत ३ धावा देऊन ३ बळी घेतले.
दुसऱ्या सामन्यात फैज कादरी संघाने रामभाऊ देगावकर संघाचा ८ गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला. रामभाऊ देगावकर संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र, त्यांचा पूर्ण डाव १६ षटकांत अवघ्या ३२ धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेले ३३ धावांचे लक्ष्य फैज कादरी संघाने अवघ्या ६ षटकांत २ बाद ३४ धावा करत सहज पूर्ण केले.
उत्कृष्ट गोलंदाजी करणारा एम. रोमाण शेख सामन्याचा मानकरी ठरला. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २ षटके निर्धाव टाकली आणि फक्त १ धाव देऊन २ बळी घेतले.
या दोन्ही सामन्यांमध्ये अशोक डोंबाळे व परवीन कुलकर्णी यांनी पंच म्हणून, तर शुभम मुत्तूर यांनी स्कोअरर म्हणून काम पाहिले.



















