बार्शी – सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच सक्षम राष्ट्राची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचारसरणी विकसित करुन विवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची सवय अंगीकारावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या श्रीमती जे. पी. डमरे यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिवस व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. कदम होते. प्रारंभी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे यांनी विद्यार्थ्यांना सद्भावना शपथ दिली. ग्रंथपाल ज्योती यादव यांनी प्रास्ताविक केले.
श्रीमती जे. पी. डमरे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांच्या आधुनिक व तंत्रज्ञानस्नेही भारताच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. युवकांनी आपल्या ज्ञानाचा व क्षमतेचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अंधश्रद्धेपेक्षा विवेकाला आणि अफवांपेक्षा पुराव्याला महत्त्व देत प्रश्न विचारणे, विचार करणे व चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी भारताच्या संगणक क्षेत्रातील स्वावलंबनाचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा ध्यास घेतला. C-DAC च्या माध्यमातून डॉ. विजय पांडुरंग भटकर यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेला ‘परम ८०००’ हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरला. अडचणींवर मात करुन स्वावलंबनाचा मार्ग निर्माण करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी या इतिहासातून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, प्रा. एन. आर. सारफळे, श्रीमती व्ही. पी. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एम. पी. शिंदे यांनी तर प्रा. ए. व्ही. पवार यांनी आभार मानले.
Post Views: 2