बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील विद्यार्थी श्रीअंश हुबळीकर याने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात मानाची भर पडली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दि. २५ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान मलकापूर (जि. बुलढाणा) येथील इंडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, जनता कला येथे पार पडल्या.
या स्पर्धेत श्रीअंश हुबळीकर याने आपल्या खेळातील कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर लक्षवेधी यश संपादन केले. त्याची बॅडमिंटन या क्रीडा प्रकारासाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या श्रीअंशच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक पी. डी. पाटील, योगेश उपळकर आणि विकास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
श्रीअंशच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष डॉ. एन. एन. जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मीराताई यादव व एस. बी. शेळवणे, प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.