तुळजापूर – ‘आई राजा उदो उदो… सदानंदीचा उदो उदो…’ अशा जयघोषाने दुमदुमलेल्या तुळजाई नगरीत अश्विन पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्र महोत्सवानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला तुळजापुरात भरणाऱ्या यात्रेला यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि सोलापूर परिसरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल झाले होते. भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक धार्मिक विधींच्या उत्साहात पौर्णिमा यात्रा पार पडली.
अश्विन पौर्णिमेनिमित्त सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काट्यांचे वाजतगाजत तुळजापूर नगरीत आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘आई तुळजाभवानी की जय’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. या मानाच्या काट्यांचे आगमन हे यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी मानकरी पुजारी सचिन पाटील यांनी सहकुटुंब विधिवत पूजा केली. पौर्णिमेच्या धार्मिक परंपरेनुसार विविध विधी पार पडले.
अश्विन पौर्णिमेच्या यात्रेला धार्मिक परंपरेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवानंतरही आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. देवीच्या विविध अलंकार पूजा, धार्मिक विधी आणि छबिना मिरवणुकीचे आकर्षण अनुभवण्यासाठी भाविक दरवर्षी तुळजापुरात येतात. यंदाही पौर्णिमेच्या दोन दिवसांत तुळजाई नगरीत भाविकांचा जनसागर लोटला होता. रात्री होणाऱ्या छबिना मिरवणुकीकडे भाविकांचे लक्ष लागले होते.
मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक समाधानाने आणि भक्तिभावाने आपापल्या गावाकडे परतू लागले.
सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहर आणि मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला पोलीस तैनात करण्यात आले. शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले होते. काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करून पायी येणाऱ्या भाविकांसाठी मार्ग मोकळे ठेवण्यात आले. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष होती.
भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज
यात्रेनंतर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बससेवेचे नियोजन करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुखरूप आपल्या गावी परतता यावे, तसेच प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन महामंडळाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजनबद्ध बससेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
Post Views: 11