सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या देखभालीबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच शुक्रवारी सकाळी सुमारे सव्वाकराच्या दरम्यान सोलापूर शहरात धावणाऱ्या ‘हिरकणी’ बसने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे विदारक चित्र समोर आणले. सोलापूर बसस्थानकातून अक्कलकोटकडे निघालेली ही बस रंगभवन चौकापर्यंत अक्षरशः काळा धूर ओकत धावत होती. या धुरामुळे मागील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक दुचाकीस्वारांनी धुरापासून बचाव करण्यासाठी आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर काहींनी संबंधित बसचा पाठलाग करून चालकाला वारंवार सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धूर मोठ्या प्रमाणात निघत असूनही चालकाने बस थांबविण्याची कोणतीही तत्परता दाखवली नाही. अखेर रंगभवन चौकात बस थांबल्यानंतर इंजिनमधून मोठ्या प्रमाणात ऑइल गळत असल्याचे समोर आले. काही क्षणांतच दोन ते चार लिटरपर्यंत ऑइल रस्त्यावर सांडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. धूर, ऑइल गळती आणि वाहनाच्या अवस्थेमुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी बस थांबताच आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा दुसऱ्या वाहनाने अक्कलकोटकडे जाण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या मार्गावरून धावणाऱ्या या बसमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. सतत धूर ओकणारे वाहन सार्वजनिक रस्त्यावर धावत असताना त्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना नादुरुस्त बसेस रस्त्यावर सोडल्या जात असतील, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. राज्य परिवहन महामंडळाने या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच अशा धोकादायक बसेसची त्वरित तपासणी करूनच त्या सेवेत उतरवाव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.



















