नागपूर – राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे)च्या वतीने सोमवार, ५ ऑक्टोबर पासून नागपूर येथील सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर “आत्मक्लेश आंदोलन” सुरू करणार असल्याचे ‘मास्वे’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते व महासचिव डॉ. संजय फुलकर यांनी कळविले आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मास्वे’च्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत समाजकार्य महाविद्यालयांचे प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. मात्र, या बैठकीला दोन वर्षे उलटूनही प्रश्न जैसे थेच आहेत.
मध्यंतरीच्या काळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबत अनेक बैठका आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली, प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
प्रमुख मागण्या:
– शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध कायम ठेवून रिक्त पदे भरणे.
– सर्व कर्मचाऱ्यांचे एचटीई सेवा प्रणालीद्वारे ऑनलाईन वेतन व डीसीपीएस/एनपीएस खात्यात शासन हिश्याची रक्कम जमा करणे.
– कॅसच्या (CAS) १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा करणे.
– प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करणे.
– जीपीएफ करिता स्वतंत्र लेखाशीर्ष सुरू करणे.
– सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन-उपदान प्रस्ताव मंजूर करणे व अतिप्रदान रकमेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे.
– थकीत इमारत भाडे आणि वेतनेतर अनुदान मिळणे.
शासनाच्या विविध विभागांतील समाजकार्याशी निगडित पदांसाठी ‘समाजकार्य पदवी’ ही शैक्षणिक अर्हता कायम ठेवणे.
इतर महाविद्यालयांत नवीन समाजकार्य विभाग सुरू करण्याच्या शासन निर्णयास स्थगिती देणे.





















