सोलापूर : मोबाईल हाताळतोय की मोबाईलच आपल्याला हाताळतोय? ‘लाईक’च्या नशेत, स्क्रोलिंगच्या सवयीत आणि आभासी जगाच्या मोहात अडकलेल्या समाजाला आत्मपरीक्षणाची जाणीव करून देणारे ६० चित्रांचे विशेष प्रदर्शन टिळक सभागृह आवारात भरविण्यात आले आहे. सोलापूरचे आर्टिस्ट यशवंत बिराजदार यांनी साकारलेल्या या चित्रांतून ‘मोबाईल व्यसनातून वाचनाकडे’ असा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
मोबाईलचे ‘बाळकडू’ लहानपणापासूनच मिळत असल्याने खेळण्याचे वय असलेल्या मुलांचे बालपणही मोबाईलमध्ये हरवत आहे. एका चित्रात पक्षी पिंजऱ्याबाहेर, तर माणूस मोबाईलच्या पिंजऱ्यात दाखवून बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. जेवतानाही मोबाईल न सोडणारे कुटुंब, सोशल मीडियातील ‘लाईक-डिसलाईक’मध्ये अडकलेली मानसिकता आणि घातक स्क्रोलिंगचे परिणाम विविध कलाकृतींतून स्पष्ट केले आहेत.
‘पाल्याला मोबाईल दिला म्हणजे जबाबदारी संपली नाही’, ‘तुमचा वेळ अॅप्स घेत आहेत’, ‘लोकांचे स्टेटस पाहण्यापेक्षा आपला स्टेटस वाढवा’, असे संदेश चित्रांमधून देण्यात आले आहेत. मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘फेसबुकवर हजारो आहेत.बुक वाचणारे मात्र दुर्मिळ आहेत’, ‘पुस्तक वाचणारे डोळेच मोबाईल हिरावून घेत आहे’, अशा आशयाच्या चित्रांमधून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘यंत्रे माणसाळली पण माणूस बिघडला’ या वास्तवाची जाणीव करून देत ‘फक्त मी नाही, आपण बाहेर पडू या’ असा संदेश प्रदर्शनातून देण्यात आला आहे.
—–
Post Views: 10