सोलापूर : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढत्या वापरामुळे बॅटरीचे तापमान नियंत्रण हे महत्त्वाचे आव्हान बनले आहे. याच पार्श्वभूमीवर ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर च्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “एअर-कूल्ड ईव्ही बॅटरी आणि एनक्लोजर डिझाइन (Air-Cooled EV Battery and Enclosure Design)” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
या प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी हवेच्या माध्यमातून कूलिंग करणारी प्रणाली आणि त्यासाठी आवश्यक एन्क्लोजरची रचना विकसित करण्यात आली. बॅटरीच्या कार्यक्षमतेवर व आयुष्यावर तापमानाचा मोठा परिणाम होत असल्याने सुरक्षित व परिणामकारक उष्णता व्यवस्थापनावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला. बॅटरी पॅकमधील उष्णता प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी योग्य हवेचा प्रवाह, तापमान वितरण आणि हॉटस्पॉट्स टाळण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला.
प्रकल्पाच्या निष्कर्षांनुसार, एअर-कूल्ड प्रणाली ही कमी खर्चिक, हलकी, देखभाल सुलभ आणि लघु व मध्यम क्षमतेच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले. या प्रणालीमुळे बॅटरीचे तापमान सुरक्षित मर्यादेत राखणे शक्य होत असून बॅटरीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होते.
हा प्रकल्प अथर्व देशमुख, यशराज कल्याणी, मेघा म्हेत्रे आणि संजना इंगळे या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. प्रकल्पासाठी प्रा. आर. एस. मोटगी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रकल्पाचे संस्थेचे अध्य्क्ष मा. श्री. एस. ए. पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चोगुले व उपप्राचार्य श्री. एस. के. मोहिते यांनी कौतुक केले तसेच सर्वानी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील शाश्वत आणि किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.



















