पिलीव – संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळेच शासनाने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच अकरा तालुक्याचा पहील्या यादीतच समावेश केला आहे. यामुळे दुष्काळी उपाययोजनांबाबत शासन सकारात्मक असुन यामुळेच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. हे पंचनामे सोयाबीन, उडीद यासारख्या पिकापुरते मर्यादित न ठेवता ऊस ,केळी यासह बागायती पिके व इतर सर्वच पिकांचे व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाने महसुल, कृषी व ग्रामविकास या तिन्ही यंञणांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व पंचनामे आठ दिवसात करुन त्याचा अहवाल शासनाला विस ऑक्टोबर पुर्वी देण्यास सांगीतले आहे. पिकांचे पंचनामे पुर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनाकडे जाणार असून त्यानुसार शासन पुढील उपाययोजना व मदत करणार आहे. सर्वच नुकसानीचे पंचनामे करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या कागदपञासाठी धावपळ सुरु आहे. ऊस, केळी व इतर बागायती पिकांचे पंचनामे होणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. ही सर्व प्रक्रीया पुर्ण होऊन दुष्काळात होरपळलेल्या व महागाईने ञस्त असणाऱ्या शेतकऱ्यांची शासन दिवाळी गोड करणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे . चौकट _ शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत ते काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे .माञ कोणत्या पिकाला ,फळबागांना किती मदत मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे?