
सोलापूर – पर्यावरण रक्षणासाठी सोलापुरकरांनी वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षण गतिविधीचे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी प्रविण तळे यांनी व्यक्त केली. आयएमए सभागृहात पर्यावरण विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल हजर होते.
ते म्हणाले, सोलापूरच्या तापमानाने यावर्षी उच्चांक केला. पण शेजारील लातूर शहरात डॉ. पवन लड्डा यांनी वृक्षलागवडीने क्रांती घडवली. तेथील तापमान आता कमी झाले आहे. सोलापूरकरांनी अद्याप याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे भविष्यातील उष्णतेचे संकट वाढणार आहे. अगदी प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम आहे. एवढ्या उन्हात पर्यटक देखील थांबणार नाहीत. पण प्रत्येकाने थोडासा वेळ देऊन हिरवाई वाढवली तर चित्र बदलू शकते. आम्ही वृक्षाच्या संवर्धनावर कार्य करणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेने देखील नागरिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी तलाव व आदिला नदी यांचे संवर्धन करुन त्या सौंदर्याने परिपूर्ण झाल्यास शहराचे वैभव वाढेल. प्लॅस्टीकचा वापर थांबवला पाहीजे. प्लेट बॅंकांसारखे उपक्रम त्यासाठी आदर्श आहेत. कत्तलखान्यामुळे शहरात प्रदूषण वाढते आहे. उजनीचे पाणी प्रदुषित झाल्याने कर्करोगाचा प्रसार होत आहे.






















